Monday, June 2, 2008

आपण सारे अर्जुन!

मराठीत ब्लॉग लिहावा असं खूप दिवसांपासून वाटत होतं, पण लिहायचं कशाबद्दल हा प्रश्न होता. तसं वाटत होतं कारण शेवटी माणूस विचार करायला शिकतो मातृभाशेतच. आणि शेवटी विषय सापडला तो एका मराठी पुस्तकाचा.

पुस्तकाचं नाव शीर्षकात आलं आहेच. वपुंचं हे एक अप्रतिम पुस्तक. पुस्तकाची थीम अर्थातच "अर्जुन", पण ह्या पुस्तकाचा महाभारताशी संबंध जोड़न्याचं काहीही कारण नाही. म्हणजे महाभारताचा उल्लेख आहे, पण एखाद्या रुपकासारखा. रूपक (metaphor) कशासाठी? आपल्या आयुष्यासाठी. बरोबरच आहे. आपलं आयुष्य एक "मिनी" महाभारतच आह. फक्त पाच हजार वर्षापुर्वी जे घडलं त्याची "स्केल" खूप मोठी आहे आपल्या आयुष्यापेक्षा. आपल्याला येणार्या प्रत्येक अनुभवाला समांतर असं काहीतरी महाभारतात नक्की सापडेल।


या पुस्तकाची समीक्षा करण्याची माझी पात्रता नाही. तेव्हा त्यातलं जे काही भावलं ते वपुन्च्याच शब्दांत -
"मला वाटतं, प्रत्येक माणूस दुसर्या माणसाला स्वतःसारखं करण्याच्या खताटोपात असतो. संघर्शाचं हेच कारण आहे."

"एका आन्धल्या राजानं विचारलेल्या प्रश्नापासून गीतेसारख्या महान ग्रंथाचा प्रारंभ होतो. जगात जितके प्रश्न निर्माण होतात, ते आन्धल्या माणसांपासूनच."

"अंधारात उडी घेणारी माणसं दोनच प्रकारात मोडतात. पहिला जन्मांध. कारण त्याच्याजवल प्रकाशाचा अनुभवच नाही.
- आणि दुसरा स्वयंप्रकाशित असा माणूस. जिथं जातो, तिथं अंधारच उरत नाही."

"कोणतीही कृती करत असताना आपण ती का करत आहोत, त्यात जिव्हाला किती, नाटक किती, उमाला किती आणि नाइलाजास्तव किती, समाजात प्रतिष्ठा मिलवन्यासाठी किती आणि शुद्ध सात्विक भाव किती, हे ज्याचं त्याला माहीत असतं. अशा अनेक प्रसंगी स्वतःचं स्वतःला होतं, ते द्न्यान."

"प्रत्येक माणसाला त्याच्या स्वतःइतकं जवळचं कुणीही नसतं. म्हणूनच प्रत्येक जन एकटा असतो. प्रत्येकाची भावनात्मक पातली वेगली. बुद्धीची उंची स्वतःची. पर्वतराशी अखंड असते, ती पायथ्याशी. शिखराकड़ं निघालात की खंड व्हायला सुरुवात.
प्रत्येक शिखर कमी-जास्त प्रमाणात उंच. म्हणूनच ती एकेकटी. त्यामुलंच ती मोजता येतात.
मानसाचं ह्यापेक्षा वेगलं काय असतं?"

ही वाक्यं आवर्जून, विचार करून लिहिल्यासारखी वाटत नाहीत, सहज येतात. आणि म्हणूनच मनाला भावतात. हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं त्यापेक्षा कित्येक पट जास्त परिनामकारक भासलं, गेल्या आठवडयात पुन्हा वाचलं तेव्हा. कदाचित त्यावेली माझाही अर्जुन झालेला होता म्हणुन. आणि माझा अर्जुन का झाला होता? जमलं तर लिहूनच सांगेन!